
शेवाळीवाडी फाटा चाैकात पाच वाहनांचा विचित्र अपघात
शेवाळीवाडी फाटा चाैकात वाहतूक कोंडी नित्याचीच, बेशिस्तीमुळे मोठ्या अपघाताची शक्यता
पुणे – पुण्यात अपघाताचे प्रमाण खुपच वाढले आहे. त्यातच आजच्या दिवसाचीच सुरुवात अपघाताने झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी फाटा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे सोलापूर महामार्गावर सकाळी एक ट्रक, तीन कार आणि एका खाजगी बसचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. पण अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी अपघात स्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. सध्या शेवाळवाडी चाैकातील वाहतूक सुरळीत असून, अपघातामुळे रस्ता सुरक्षा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शेवाळवाडी चाैकात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब असून कोणीही येथे सिग्नलचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे तेथे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. त्याचबरोबर अनेक छोटे मोठे अपघात रोज होत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.