पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कोलते ३४ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त
पोलीस शिपाई ते उपनिरिक्षक पदापर्यंतचा विलक्षण प्रवास, पोलीस दलाकडून सन्मानपूर्वक निरोप
पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुणे शहरातील हडपसर वाहतूक विभागातील पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल रामदास कोलते आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मेला सेवानिवृत्त झाले. आपल्या ३४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरिक्षक असा मोठा पल्ला तर गाठलाच त्याशिवाय त्यांनी एकही दिवस आजारपणाची रजा देखील घेतली नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर वाहतूक विभागाकडून त्यांना निरोप देण्यात आला आहे.
विठ्ठल कोलते मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील. कोलते १ मे १९८९ साली म्हणजे महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधत एस.आर.पीमध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे याठिकाणी देखील सेवा दिली. महत्वाचे म्हणजे त्यांनी नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोलीतील देखील सेवा दिली. घनदाट जंगल, दळणवळणाची अपुरी साधने, आणि नक्षलग्रस्त भाग असूनही कोलते यांनी धीराने आपली सेवा बजावली. अनेकजण कोणत्याही सेवेत दाखल झाल्यानंतर घर आणि नोकरी असा दिनक्रम ठेवतात पण कोलते यांनी पोलीस दलात होणाऱ्या विविध खेळात सहभागी होत आपल्या संघासाठी अनेक पदके जिंकून दिली. महत्वाचे म्हणजे पोलीस शिपाई या पदावर समाधान न मानता त्यांनी विविध परीक्षा देत पोलीस उपनिरिक्षक या पदाला गवसणी घातली २०१९ साली ते उपनिरिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांनी आपल्या कसर्यकाळात स्वतः इतेक फिट ठेवले होते की त्यांनी एकदाही आजारपणाची रजा घेतली नाही. त्यामुळे त्यांची पोलीस दलात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध अधिकाऱ्यांसोबत काम केले, त्या सर्वांबरोबर काम करताना आनंद तर वाटलाच पण खूप काही शिकताही आले अशी भावना कोलते व्यक्त करत असतात. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत देखील कोलते यांनी काम केले. देशाच्या प्रथम नागरिकाच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग होत कोलते यांनी आपली वेगळी छाप सोडली.
आपली ३४ वर्षाची सेवा प्रामाणिकपणे पार पाडल्यानंतर कोलते ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पुणे शहर पोलीस आणि हडपसर वाहतूक विभागाकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत कोलते यांना निरोप देण्यात आला. पोलीस दलामुळे आपल्याला वक्तशीरपणा शिकवला असे कोलते प्रांजळपणे कबूल करतात. आता निवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा मनोद्य कोलते यांनी व्यक्त केला आहे.