
उत्तर प्रदेश दि १ (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर २५ जण असल्याची माहिती आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १९ जणांना वाचवण्यात गावकऱ्यांनी यश आले आहे. बोट बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील काही गावात सध्या पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांना डिझेलवर चालणाऱ्या बोटीची व्यवस्था करुन दिली आहे. ज्यामुळे गावकरी ये-जा करु शकतात. बुधवारी २५ जण नावेतून घरी जात होते. पण अचानक बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बोटीतील लोकांनी भीतीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावकऱ्यांची तातडीने मदत करत १९ जणांना पाण्यातून बाहेर काढले त्यांना भदौरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. इतरांवर उपचार सुरु असून ५ जण अद्यापही बेपत्ता आहेत.त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच डीएम एमपी सिंह, पोलिस अधीक्षक रोहन पी बोत्रे यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे पण अद्याप शोध न लागल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.