Latest Marathi News
Ganesh J GIF

सुषमा अंधारेंचा भाजपावर पलटवार; महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे आहेत. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले, या शब्दांत अमित शाह यांनी निशाणा साधला. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर पलटवार केला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शाह यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळ उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागत आहे. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही आणि भाषण संपवता ही येत नाही, असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले. तसेच अमित शाह यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला, ते दुर्दैवी आहे, असेही अंधारे यांनी म्हटले आहे.

ज्यांनी जिना यांच्या कबरीवर जाऊन फुले वाहिली आणि ज्यांनी निमंत्रण नसताना नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जात त्यांना केक भरवला ते कोणत्या फॅन क्लबचे सदस्य आहेत? याचे उत्तर आधी अमित शाह यांनी द्यावे. खरे तर असे शाह महाराष्ट्रावर चालून येण्याच्या पहिली घटना नाही. आदीलशाह, कुतूबशाह त्यापैकीच एक शाह हे अमित शाह आहेत. पण अशा शाह यांना परत कसे पाठवायाचे, हे महाष्ट्राच्या मातीला चांगले माहिती आहे, असा पलटवार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.

शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तरीही त्यांची सहानुभूती वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी पुण्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलायला हवे होते. परंतु, तसे काही बोलले नाही. हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवून राज्यात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला मात्र तो चालला नाही, अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!