
श्री तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ
होम हवन करून देवीची शक्ती तलवारीमध्ये काढली? , पुजा-यांचा नेमका आरोप काय?
तुळजापूर – महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात मोठा वाद उभा राहिला आहे. मंदिरातील शस्त्रपूजनासाठी वापरली जाणारी तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप मंदिरातील पुजाऱ्यांनी केला आहे.
तलवार मंदिर संस्थानाच्या खजाना खोलीतून गायब झाली आहे. दरम्यान, ही तलवार केवळ धार्मिकच नव्हे, तर अध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाची मानली जाते. पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्याकडून पूजा करून घेत शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकली आहे. तसंच होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचा दावाही पुजाऱ्यांनी केला आहे. मंत्रोपचाराने देवीच्या 8 शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून देवीची तलवार गहाळ केल्याचा आरोपही पुजाऱ्यांनी केला आहे. पुजाऱ्यांच्या या दाव्यामुळे तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे. तलवारी बाबत माहिती घेऊन सांगतो म्हणत मंदिर संस्थानने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता मंदिर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तलवार खजिना खोलीतून नेमकी कशी गायब झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गायब झालेली तलवार तात्काळ देवीच्या चरणी परत आणण्यात यावी, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.
भक्तांना दर्शन घेण्यासाठी, गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.