‘उसने घेतलेले पैसे घे नाहीतर, माझ्याशी लग्न कर’
संतापलेल्या प्रियकराकडून विवाहित महिलेची हत्या, भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा
अंबरनाथ – राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अंबरनाथ पूर्व मध्य रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर एका तरुणीवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
सीमा कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, राहुल भिंगारकर असे अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा ही आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर सीमा जिथे राहण्यासाठी गेली होती, तिथेच राहूल देखील राहत होता. सुरुवातीला त्यांच्यात ओळख झाली, आणि कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सीमाला १३ वर्षाची एक मुलगी आहे. राहुलने सीमाकडून अडीच लाख रूपये उसने घेतले होते. मात्र ते पैसे तो तिला परत करू शकत नव्हता. त्यावर तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता. तसेच लग्न केले नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती. यामुळे राहुलने सीमाच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी म्हणजे आज अंबरनाथ रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या ब्रीजवर या दोघांमध्ये याच मुद्यावर वाद झाला. त्यानंतर आरोपी राहुलने सीमावर धारधार शस्त्राने हल्ला केला. विशेष म्हणजे हत्या झाली त्यावेळी तिथे काही जण हजर होते. त्यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही हल्लोखोराने धमकावले. या हल्ल्यात सीमा गंभीर जखमी झाली होती. पण रुग्णालयात दाखल करण्यातआधीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.