भयानक! पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले
अपघातात दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक, कुटुंबावर घाला
पुणे – पुण्यातील पोर्शे कार प्रकरण शांत होत असतानाच आणखी एक ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे.दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथ वरील झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली. यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघाताची ही घटना रविवारी रात्री रात्री १२ ते १ च्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली. वैभवी रितेश पवार ( वय १), वैभव रितेश पवार (वय २), रीनेश नितेश पवार, (वय ३०) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१) रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी जखमींची नावे आहेत. डंपर चालक गजानन शंकर तोट्रे यास अटक करण्यात आली आहे. अपघातग्रस्त कुटुंबीय रविवारी रात्रीच ते अमरावती येथून बिगारी व मजुरी कामासाठी वाघोली येथे आले होते. एका कुटुंबातील १२ जण फूटपाथवर झोपले होते. तर आणखी काही जण फूटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये झोपले होते. यावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर आहे. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करण्यात आली आहे. ६ जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस स्टेशनच्या जवळच हा अपघात घडला आहे.
पोलीस या प्रकरणात अधिकच तपास करत आहेत. मुंबईतील कुर्ला याठिकाणीही अशीच दुर्घटना घडली होती. त्याला अद्याप एक महिनाही पूर्ण झालेला नाही. असे असताना पुण्यात झालेल्या या अपघाताने राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.