ठाण्यात शिवसेना शाखेवरुन ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा
शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, शाखा वाद पेटणार
ठाणे दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तिथे सुरु असलेली ठाकरे व शिंदे गटातील लढाई आता शाखेवरुन सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या ताब्यातील शाखा हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते. यावेळी जोरदार संघर्ष पहायला मिळाला. या शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला आहे. शिवाईनगर हा मतदार संघ आमदार प्रताप सरनाईक यांच्या अधिपत्याखाली येत असून या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक हे सांभाळतात. या ठिकाणचे तीनही नगरसेवक आणि संपूर्ण पदाधिकारी आमच्या समवेत आहेत. तसेच ही शाखा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ही मान्यता आम्हाला मिळाली आहे. असा दावा शिंदे गटाने केला आहे तर कोर्टाचे कुठलेही आदेश नसताना यांना टाळे तोडण्याचा हक्क कोणी दिला. जर यांना तो हक्क दिला असेल तर तो हक्क पोलिसांनी समजावून द्यावा. हे अनधिकृत कृत्य आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. जर शिवाईनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नसेल तर या शाखेचा निर्णय जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय घेणार नाही तो पर्यंत या शाखेचा ताबा पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान शिवाईनगरची शाखा ही गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे.
ठाण्यात शाखेचा वाद चांगलाच पेटला आहे. शाखा ताब्यात घेण्यावरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमा झाल्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा शाखेबाहेर तैनात करण्यात आला होता. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा शाखेच्या ताब्यावरून दोन्ही गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.