
‘त्या’ एका पोस्टमुळे यवतमध्ये दोन गट भिडले, तुफान राडा
पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले कारण, नेमक काय घडल
दाैंड – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून, त्याचे पडसाद संपूर्ण परिसरात उमटत आहेत. एका तरुणाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव वाढला असून, गावात दगडफेक व जाळपोळ झाली आहे.
या घटनेमुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका बाहेरील व्यक्तीने एका पुजाऱ्यावर बलात्काराचा आरोप करणारे स्टेटस ठेवले. या अफवेमुळे तणाव निर्माण होऊन लोक रस्त्यावर उतरले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेसंदर्भात काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “हे व्हिडिओ यवतचे आहेत की बाहेरचे, हे तपासले जाईल. अशा परिस्थितीत बाहेरचे व्हिडिओ दाखवून अफवा पसरवल्या जातात. मी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन करतो. तसेच जाणीवपूर्वक असा तणाव निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. यवतमध्ये यापूर्वीच, २६ जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच, अवघ्या काही दिवसांतच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्याने वातावरण आणखी पेटले आहे.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, असे असले तरी, यवतमध्ये तणावाचे वातावरण आहे. संपूर्ण गावासह आसपासच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.