कात्रज कोंढवा रोडवरील अपघात सत्र सुरूच ! रोडवर पाठीमागून आलेल्या क्रेनच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यु
कात्रज कोंढवा रोडवरील वाहनांच्या संख्येने वेगाने वाढ झाली असली तरी गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. अशातच पावसामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. याच रोडवर क्रेनने पुढे जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला.
चंदाराम तेजाराम चौधरी (वय ३५) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत जेठाराम बाबुलाल जाट (वय २०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्रेनचालक राजाराम भगवान देवकर (वय ४१) याला अटक केली आहे. प्रकार खडी मशीन चौकाच्या पुढे बालाजी हॉटेलजवळ २६ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि चंदाराम चौधरी हे त्यांचे नातेवाईक रामनिवास चौधरी यांच्या ग्रॅनाईटचे दुकानात कामाला आहे. दुकानातील काम संपवून रात्री साडेदहा वाजता चंदाराम यांच्या दुचाकीवर बसून फिर्यादी घरी जात होते. खडी मशीन चौकाच्या पुढे बालाजी हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या एका क्रेनने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी डाव्या बाजूला पडले तर चंदाराम हे उजव्या बाजूला क्रेनच्या समोर पडले. त्यामुळे चंदाराम चौधरी यांच्या अंगावरुन क्रेनचे चाक गेल्याने त्याचां जागीच मृत्यु झाला. पोलिसांनी क्रेनचालकाला अटक केली आहे.