मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मध्यरात्री तणावाचे वातावरण..! ठाकरे-शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा, नेमके प्रकरण काय ?
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मध्यरात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना पैसे आणि काही वस्तू वाटप करत असल्याची माहिती मतदारसंघात पसरली होती. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जाब विचारण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जोरदार राडा झाला.
पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक झाली. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मातोश्री क्लब येथे गेल्यानंतर वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली, त्यामुळे पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. या सगळ्या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब येथे आले. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ‘अनेक ठिकाणी पैसेवाटप, धान्यवाटप सुरु आहे. गेले अनेक दिवस मातोश्री क्लबवर पैसे वाटले जात आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. मातोश्री क्लबवर गुंड आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत’, असे अनिल परब यांनी म्हटले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक फ्लाईंग स्क्वाड आणि पोलिसांकडे तक्रार करत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत. मध्यरात्री साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास गावदेवी डोंगर परिसरात मतदारांना भेटवस्तू वाटण्यासाठी हा ट्रक आला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वाटपाचा हा कार्यक्रम उधळून लावला. या घटनेमुळे येथील वातावरण तापले होते.