लोकसभा निवडणुकीती निकालानंतर भाजपला एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार आले असले तरी भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. आणि महाराष्ट्रात तर पक्षाची मोठी पिछेहाट झाली.त्यातच विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून त्यापूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. महत्वाचं म्हणजे भाजपमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून आज दुपारी त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या, आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहेत. त्यातच आता सूर्यकांता पाटील आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असून आज मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी सुर्यकांता पाटील यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. सुर्यकांता पाटील यांची नांदेड जिल्ह्यात डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. मागील 10 वर्षांपासून सुर्यकांता पाटील ह्या भाजपामध्ये काम करीत होत्या. मात्र पक्षाने पाटील यांना कुठलेही जवाबदारी दिली नव्हती. त्यामुळेच सूर्यकांता पाटील ह्या भाजपा पक्षावर नाराज होत्या, अशी चर्चा आहे.
गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षात असलेल्या सूर्यकांता पाटील या आज पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ‘ काय मिळणार आहे मला माहित नाही, मला कशाची अपेक्षा नाही’ असं त्या म्हणाल्या.दोनच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे भाजपच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माझ्या मनात कोणती कटूता नाही. मी भारतीय जनता पार्टीची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे, असं म्हणत त्यांनी पक्ष सोडला.मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या 84 हदगावच्या संयोजकपदाचा राजीनामा देत आहे. आपल्यासोबत गेल्या 10 वर्षांपासून खूप काही शिकता आलं. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केलं. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भाजपची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेते. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला. पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही. कोणतीही कटूता मनात न ठेवता मी आपला राजीनामा देत आहे.