
म्हणुन ‘या’ महिलेचा मृतदेह दीड महिन्यापासून अंत्यसंस्काराविना
मृतदेहाचे विच्छेदन होऊन मुलीला न्याय मिळण्याची कुटुंबियांना आशा
नंदुरबार दि १३ (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एका आदिवासी मुलीचा मृतदेह दीड महिना झाले अंत्यसंस्काराविना आहे. बलात्कार करून मुलीची हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप करीत तिच्या वडिलांनी केला आहे. आपल्या मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन केले जाईल आणि या गुन्ह्याचा छडा लागेल, या आशेवर ते कुटुंब आहे. विशेष म्हणजे आदिवासी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची विवाहित मुलगी माहेरी आलेली असताना वावी गावातील तिच्या परिचयाच्या रणजित ठाकरे आणि अन्य एकाने तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून गावाबाहेर नेले. त्यावेळी पीडितेने मोबाइलवरून नातलगांशी संपर्क साधत रणजितसह चार जण आपल्यावर अत्याचार करीत असून ते आपल्याला जिवानीशी मारतील अशी भिती व्यक्त केली. पण काहीवेळाने आंब्याच्या झाडाला तिने गळफास घेतल्याचे तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. मृतदेह खाली उतरवत पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार करूनही पोलिसांनी त्या दिशेने तपास केला नाही. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर आजपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार केलेले नाहीत. पुन्हा शवविच्छेदन होईल, या आशेवर तिचे पार्थिव मिठाच्या खड्डय़ात ठेवले आहे” असा दावा पीडितेच्या वडिलांनी केला आहे. तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांनी सांगितले नाही, त्यामुळे तसे विच्छेदन झाले नसल्याची धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची आॅडीओही कुटुंबियांनी सादर केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली जात होती.
या घटनेची बातमी पोलिसांना समजताच आतापर्यंत रणजित ठाकरे, सुनील उर्फ हाना वळवी,अमर उर्फ गोटू वळवी या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्याची सूचना अधीक्षकांनी धडगाव पोलीस ठाण्यास केली. त्यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे या कुटुंबियाला न्याय मिळण्याची आशा आहे.