कारमध्ये होरपळून पत्नीचा मृत्यू? तपासात वेगळेच सत्य समोर
पतीच निघाला मारेकरी, अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत, यामुळे फुटले बिंग
जालना दि ३०(प्रतिनिधी)- जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. पण तपासाअंती पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले आहे.
सविता अमोल सोळंके असे जळून मरण पावलेल्या पत्नीचे नाव आहे. तर अमोल गंगाधर सोळंके असे पतीचे नाव आहे. मंठा लोणार रस्त्यावर गाडी उभा असताना एका पिकअपने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघातानंतर कारला आग लागली आणि यामध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मृत महिलेचा पती या अपघातातून थोडक्यात बचावला होता. पण पोलीसांनी तपास केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले आहे. सविता अमोल सोळंके यांना मागील १३ वर्षापासून मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे त्यांचा पती अमोल हा घटस्फोट दे असे म्हणून सविता सोळंके यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत होता. मात्र, त्यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांने सविता यांना मारायचा कट रचला. त्यानंतर सविता यांना दर्शनासाठी जायचे आहे म्हणून कारमध्ये बाहेर नेले. नंत् सविता यांना कारमध्ये टाकून जीवंत जाळले. नंतर अपघात झाल्याचा बनाव केला. पण टेम्पोने कारला धडक दिली तर कार डॅमेज कशी झाली नाही? काळ जळत असताना पतीने काचा फोडून पत्नीला का वाचवले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे पोलीसांनी तपास केला असता पतीचा बनाव उघड झाला.
सविता यांचे भाऊ बळीराम जाधव यांच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेतील संशयित आरोपी अमोलला पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाम गायके, सुमित होंडे यांनी आरोपीस परतूर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत.