टोळक्याचा महिला शिक्षकेच्या घरात शिरुन राडा ! आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत केली दहशत; ५ जणांवर गुन्हा दाखल
स्वत: ला भाई म्हणविणार्या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकीतील गोपी चाळ येथे राहणार्या एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आशिष कांगणे (वय १८), गौरव कांगणे (वय १९), छोटा लोहार (वय २०), अलोक रोकडे ऊर्फ सोनु (वय १९), मॅड्या ऊर्फ यश साळवे (वय २०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी सोमवारी दुपारी चार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात काही वाद झाले होते. फिर्यादी या घरात ट्युशन घेत होत्या. त्यावेळी आरोपी घरात शिरले. त्यांनी घरात येऊन मुलगा कोठे आहे, असा जाब विचारला. आशीष कांगणे याने हातातील रॉडने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करुन त्याची तोडफोड करुन नुकसान केले. अश्लिल शिवीगाळ करुन दमदाटी केली. आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण केली आहे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत.