मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर जिंतूर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार जिंतूर पोलीस फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील दीड वर्षांपासून आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला आहे. त्यांना मराठा समाजाकडून पाठींबा देखील मिळत आहे. दरम्यान, आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहता मनोज जरांगे पाटील यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार मागील चार- पाच महिन्यापासून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुकवरून बदनामीकारक फोटो व मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होते. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना शिवीगाळ करणे, फोटो मोर्फ करणे, यामुळे मराठा समाजाच्या सातत्याने भावना दुखावत आहेत.
यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुक पेज चालवणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.