वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत
अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे उच्चाटन करण्यात वारीचे मोठे योगदान, कोणी केली मागणी
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या निधीतून प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीची आस घेऊन दरवर्षी वारी निघते. पंढरपूर वारीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव नसलेली समाजासमोर एक आदर्श निर्माण घालून देणारी ही वारी पंरपरा आहे. दरवर्षी जगतगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह इतर पालख्या पंढरपूरकडे जात असतात. या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने अबाल-वृद्ध भक्तीरसात तल्लीन होत असतात. वारीमध्ये भक्तीरसाबरोबर समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत असते. समाजाला लागलेली अंधश्रद्धा व व्यसनाची कीड समूळ नष्ट करण्याचे काम या दिंड्यांच्या माध्यमातून होत असते. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदाही केलेला आहे. व्यसमुक्तीसाठीही सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातात पण हे काम केवळ कायद्याच्या माध्यमातून होत नाही त्याला समाजप्रबोधनाची जोडही असावे लागते, तेच काम वारीतील दिंड्या करत आहेत.
आषाढी वारीचे औचित्य साधून व्यसमुक्ती दिंडी काढून विविध ठिकाणी प्रचार व प्रसार केला जातो. विठुनामाच्या गजरात व्यसनमुक्ती व अंद्धश्रद्धा निर्मूलनाचे मोठे सामाजिक कार्य होत असते. राज्य सरकारने या कार्याची दखल घेऊन प्रत्येक दिंडीला ५० हजार देऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी द्यावे असे पटोले म्हणाले आहेत.