नव्या संसद भवन उद्घाटनावरून विरोधी पक्ष एकवटले
मोदींना विरोध करत या विरोधकांचा कार्यक्रमावर बहिष्कार, भाजप निर्णय बदलणार की ठाम राहणार?
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून सुरू असलेली राजकीय संघर्ष आता बहिष्कार टाकण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. अनेक पक्षांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नाही तर राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी केली आहे. अन्यथा या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे.
देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या २८ तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. पण विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमाचा बहिष्कार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान सुरूवातीला तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, सीपीएम आणि सीपीआय यांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने देखील बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विरोधी पक्ष या उद्धाटन समारंभापासून दूर राहण्याबाबत संयुक्त निवेदन जाहीर करू शकतात. विशेष म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये नवीन संसद भवनाच्या पायाभरणी समारंभात काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सहभागी झाले नव्हते. आतापर्यंत १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यात अगोदरच्या पक्षांबरोबरच समाजवादी पार्टी, राजद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फ्रेन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिवोल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथिगल, कच्ची, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कडगम, राष्ट्रीय लोकदल या पक्षांचा समावेश नव्याने झाला आहे.
दुसरीकडे हरदीप पुरी यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २४ ऑक्टोबर १९७५ रोजी संसदेच्या एका भागाचे उद्घाटन केले होते. त्याच वेळी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १५ ऑगस्ट १९८७ रोजी संसदेच्या ग्रंथालयाची पायाभरणी केली होती असे म्हणत नव्या संसद भवनाचे उद्घाटन मोदीच करतील असा ठाम पवित्रा घेतला आहे.