शिंदे गटाच्या या मंत्र्यांची पदावरून उचलबांगडी
या मंत्र्याचाही पदभार काढण्याची शक्यता? नवीन आमदारांची लाॅबिंग? नेमक काय घडलं?
मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तर भरतशेठ गोगावले यांनाही एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही संजय शिरसाट हे सिडकोच्या अध्यक्षपदावर कायम होते. मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. शिससाट यांनी नव्या सरकारमध्ये कॅबिनेट पदाची शपथ घेतली. यानंतर सरकारच्या नियमानुसार त्यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होता. परंतु दीड महिने उलटूनही त्यांनी पदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्याकडील सिडकोचा कार्यभार संपुष्टात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यानंतर, संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. शासनाच्या नियमानुसार, मंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तींनी इतर कोणत्याही पदाचा कार्यभार सांभाळू नये, हा नियम लागू होतो. त्यामुळे संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरील कारकीर्द संपुष्टात आणली गेली आहे. राज्यातील सर्वात मोठे आणि श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोकडे पाहिले जाते. प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आणि नागरी वसाहती विकसित करण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सिडको नोडल एजन्सी आहे. दरम्यान प्रमोद हिंदुराव यांच्यानंतर पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
सिडकोच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील अनेक आमदारांनी या पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. सिडकोसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपा आणि शिंदे गटात यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पण सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजपा हे पद स्वतः कडे घेऊ शकते.