Latest Marathi News
Ganesh J GIF

वादळी वाऱ्याने बाळ हिरावले, घराच्या छतासह बाळ झोपलेला झोपळा उडाला

बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सोसाट्याच्या वाऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले. वादळी वाऱ्याने घराच्या छतासह अँगलला बांधलेला झोपाळा पण आकाशात उडाला.त्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. वादळी वाऱ्याने अँगलसह चिमुकली झोपलेला झोपळा पण उडवला. यात या सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोसाट्याच्या वादळाने देऊळगाव घुबे येथील साखरे कुटुंबियांवर मोठा आघात केला. सोसाट्याचा वारा आल्यावर भरत मधुकर साखरे यांच्या घरावरील पत्रे, त्यासाठीचा अँगल आणि या अँगलला बांधलेला झोपळा पण हवेत उडाले. हवेचा जोर इतका होता की, पत्रे आणि अँगल 200 फुटापर्यंत उडाले. या झोपाळ्यात भरत साखरे यांची मुलगी सई ही होती. ती अवघ्या सहा महिन्यांची होती. तिचा या घटनेत मृत्यू ओढावला. साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 11 जूनच्या संध्याकाळी ही घटना घडली.

हवामान विभागाने विदर्भात दमदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने बुलढाणा जिल्ह्याला झोडपले. 11 जूनच्या संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वारे आणि पावसाने अनेक मोठी झाडे उन्मळून पडली तर काही घरांवरील पत्रे उडाली. तर काही भागात वाहनांचे नुकसान झाले. विदर्भासह बुलढाणा जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. तर वादळाने पण अनेक गावांमध्ये नुकसान केल्याचे समोर येत आहे.परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कानसूर येथे पण एकाचा मृत्यू ओढावला. 70 वर्षीय वृद्धाच्या अंगावर गोठा कोसळला. त्यात या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. नारायण सुरवसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने गोठा कोसळला. याविषयीची माहिती मृताच्या कुटुंबियांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!