कसब्यात झळकले रवींद्र धंगेकर आणि हेंमत रासनेंच्या विजयाचे बॅनर
निकालापूर्वीच कसब्यासाठी बॅनर वाॅर, अभिनंदनाच्या बॅनर्सची शहरात चर्चा
पुणे दि २८(प्रतिनिधी)- भाजपाच्या स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. एकनाथ शिंदे यांनी या निवडणूकीत रोड शो केला होता, यावरून ही निवडणूक किती महत्वाची होती हे दिसून आले. पोटनिडणुकीसाठी मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात लढत पहायला मिळाली.
पोटनिवडणूकीचा निकाल २ मार्चला लागणार आहे. आता या पोटनिवडणुकीत निकालाच्या आधीच रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात विजयाची बॅनरबाजी केली आहे. या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चांगलीच चुरस झाली. पुण्यातील समाधान चौकात हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लागले. तर रविंद्र धंगेकर यांचे विजयाचे बॅनर वडगाव बुद्रुक परिसरात लावण्यात आले होते. एकदंरीत पुण्यात पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बॅनरबाजीला उधाण आले आहे. दरम्यान निवडणुकीचा प्रचार संपल्यावर प्रचार केल्यामुळे आणि आचारसंहितेचा भंग केल्यामुळे रासने आणि धंगेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण सध्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाची चर्चा रंगली आहे.
कसब्यात मतदानानंतर उमेदवारांचे थेट विजयी आणि अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर ते बॅनर हटवण्यात देखील आले. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी या बॅनरबाजीमुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पण खरा विजयी कोण हे गुरूवारच्या निकालावर ठरणार आहे.