नोकरी लागताच पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार
नोकरी लागल्यानंतर पत्नीने धोका दिल्याचा पतीचा आरोप, पत्नीचेही गंभीर आरोप, वादात मोठी वाढ
लखनऊ दि ९(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशच्या एसडीएम ज्योती मौर्या आणि त्यांचे पती यांच्यात सुरू असलेला वाद सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील आणखी एका सरकारी अधिकाऱ्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर महिला बदलतात का? अशी चर्चा होत आहे.
कानपूर देहात येथील रविंद्र पुरम गाला येथील ही घटना आहे. तेथील अर्जुनचा विवाह बस्ती जिल्ह्यातील सविता माैर्यसोबत २०१७ साली झाला होता. लग्नानंतर सविताने अर्जुनकडे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला अर्जुनने होकार दिला. त्याने आपल्या पत्नीला कानपुरच्या मंधना येथील रामा कॉलेज ऑफ नर्सिंग अॅण्ड पॅरा मेडिकल सायन्समध्ये प्रवेश घेऊन दिला. त्यासाठी त्याने कर्ज देखील काढले. तो तिला दर महिन्याला पैसे पाठवत होता. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सविताला दिल्लीच्या एका रूग्णालयात नोकरी मिळाली. पण नोकरी मिळून काही दिवस होताच अर्जुनला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला, त्यामुळे त्याने तिला पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर ती रसूलाबादच्या नारखुर्द येथील स्वास्थ्य केंद्रात कामाला लागली. त्यानंतर ती अर्जुनला तु काळा आहेस, तू मला आवडत नाही, आपले स्टेटस वेगळे आहे, असे म्हणत वेगळे राहू लागली. त्यानंतर अर्जुनने शासनाकडे धाव घेत मदतीची मागणी केली आहे.
सविता मौर्याने देखील आपल्या पतीवर आरोप केले आहेत. पती अर्जुन माझ्यावर सतत अत्याचार करायचा, त्यामुळे तिने फेब्रुवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिच्या पतीने शिक्षणासाठी मदत केली. पण बाकीचे पैसे आईने दिले. तसेच तिच्या आईने तिच्या शिक्षणासाठी आणि हुंडयासाठी अर्जुनला ५ लाख रुपये दिले होते. असा दावा सविताने केला आहे.