पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला दारुड्या पतीचा काटा
यवत पोलीसांच्या तपासात पत्नीचा कारनामा उघड, पत्नी प्रियकराचा तो डाव फसला
दाैंड दि २०(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अवघ्या २४ तासात पोलीसांनी या खूनाचा छडा लावला आहे.
सुनील पांडुरंग जगताप असे मृत पतीचे नाव असून शीतल जगताप आणि तिचा प्रियकर अतुल चौघुले यांना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून भांडगाव येथे सुनील जगताप आणि शितल जगताप हे दाम्पत्य राहत होते. शितल जगताप हिचा नवरा सुनील दारु पित असे. त्यामुळे त्यांच्यात वाद होत असत. त्यादरम्यान शीतल आणि गावात राहणारा अतुल चौगुले या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने शितल जगताप व तिचा प्रियकर अतुल चौगुले या दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार १५ मे २०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुनिल जगताप घरासमोर झोपलेला असताना पत्नीने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. त्यानंतर पत्नी शीतल हिने १७ मेला यवत पोलीस ठाण्यात आपला पती सुनील जगताप हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बेपत्ता असलेल्या सुनील जगताप याचा घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला. सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याने पोलिसांना संशय आला. त्याअनुषंगाने यवत पोलिसांनी शेजारी राहणारे व इतर साक्षीदारांकडे चौकशी केली असता शीतल जगताप व अतुल चौघुले यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी पत्नीला बोलवून घेत विचारपूस केली. पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर दोघांनी संगनमताने त्याचा खून केल्याचे कबुल केले. रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अनैतिक संबंध तसेच प्रेमप्रकरणातून घडत आहे. ग्रामीण भागातही यात वाढ झाली आहे. पण पोलीसांनी वेगाने तपास करत आरोपींना गजाआड केले आहे.