
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट कुठेच नाही, हरामीपणा…
शिंदे गटाच्या आमदाराचा पोलीसांवर गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीसांवर टिका? आमदारामुळे महायुतीत तणाव?
बुलढाणा – बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असतात. त्यामुळे अनेकदा ते अडचणीत येतात. स्वतः बरोबर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील अडचणीत आणत असतात. आता पुन्हा एकदा गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केल्याने महायुतीत तणाव होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिल रोजी बुलढाणा येथे आभार सभेसाठी येणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी संजय गायकवाड यांनी त्यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयात एक पत्रकार परिषद बोलावली होती. संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर ५० लाख पकडले तर ते ५० हजार दाखवतात. सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढतो. गुटखाबंदी आणि दारूबंदी केली तर, पोलिसांचा एक-एक हप्ता वाढतो. बुलढाण्यातील दोन पोलीस चोरांचे सरदार आहेत. चोरीचा माल त्यांच्या घरात आढळतोच कसा? असा प्रश्न उपस्थित करत संजय गायकवाड म्हणाले की, पोलिसांनी जर इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी घाण साफ होईल. पोलिसांनी फक्त सद्रक्षणाय खलनिग्रहाय या त्यांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे काम केले पाहिजे. जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल, असेह गायकवाड म्हणाले आहेत. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केल्यानंतर गायकवाड म्हणाले होते कि, हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि ती सर्वत्र बोलली जाते. मी म्हणेन की दहशतवाद्यांचे संदेश समजून घेण्यासाठी राज्यात केवळ हिंदीच नाही तर उर्दू देखील शिकवली पाहिजे. यावरून देखील बराच वाद झाला होता. दरम्यान आता गायकवाड यांच्या वक्तव्यावर महायुतीत काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागच्या वेळी आठ महिने सीमेवर फौजा उभ्या राहिल्या, मात्र काहीच झालं नाही. एकदाच पाकिस्तान चिरडून पीओके ताब्यात घ्या असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. या पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करण्याचा निर्णय घेतो. एकदाच पाकिस्तानला चिरडून टाकलं पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी मोदींना दिला आहे.