…म्हणून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी
सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या अवमानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे महाराष्ट्र सदनातून हटविल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यातील सारसबागे जवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शने करण्यात आली.
गेल्या २८ तारखेला महाराष्ट्र सदन येथे सावरकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले गेले. देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व आपली संस्कृती जतन करण्यासाठी हजारो मंदिरांचा जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अवमान या कार्यक्रमांमध्ये झाला आहे. कर्तृत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाहीत, ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले, महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नयेत एवढा द्वेष का? असा संतप्त सवालही प्रशांत जगताप यांनी विचारला आहे.
या दोन कर्तबगार महिलांनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल, या घटनेबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागावी अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.