
मला ट्रोल करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात, पण काही फरक पडत नाही
मुख्यमंत्र्याच्या पत्नीने ट्रोलर्सला सुनावले, मुख्यमंत्री पतीवर केला कौतुकाचा वर्षाव, यामुळे झाल्या होत्या ट्रोल?
मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी नुकतेच इंडिया टुडेच्या कार्यक्रमात ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
अमृता फडणवीस यांनी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी जाऊन स्वच्छता मोहिम राबवली. त्यांचे हे काम कौतुकास्पद होते. पण, त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “माझ्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडले आहेत, जेव्हा सोशल मीडियावर लोक माझ्याबाबतीत ओव्हर रिअॅक्ट होतात. अशा अनावश्यक गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात. मी गणेश उत्सवानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिम राबवली. समाजातले काही घटक, एनजीओ आणि लहान मुलांची साथही आम्हाला लाभली. पर्यावरण पूरक गणपती मूर्ती घरी आणा यासाठीही आम्ही लोकांना संदेश दिला. मात्र ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवला आणि मी कसे कपडे घातले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं मुख्य विषय काय होता तो लक्षात घेतला पाहिजे. मला ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही मला ठाऊक आहे त्यांना याचे पैसे मिळतात. त्यामुळे हे ट्रोलर्स अशा पद्धतीने व्यक्त होतात. ज्या महिलेकडे स्वतःचा आवाज आहे, जी समस्या व्यवस्थित समजू शकते, तिला ट्रोलर्स लक्ष्य करणारच, असे मत अमृता म्हणाल्या. “हे केवळ माझ्याबाबतीत नाही, तर प्रत्येक स्वतंत्र महिलेला लागू होते. जेव्हा तुमच्याकडे तुमचा आवाज असतो, तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो,” असे त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, माझ्या सासरच्या लोकांनी आणि माझ्या पालकांनी आम्हाला आमची स्पेस दिली आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेवर मला घरी स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या विचारांचा आदर करतो”, असेही त्या म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस या गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारी पार पडलेल्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या. त्यावेळेसचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ हे व्हायरल झाले होते.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई २०२५ मध्ये बोलताना अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कपड्यांवरून टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. पण त्याचवेळी त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत त्यांची स्पष्ट मतं देखील मांडली. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री आणि त्याचे पती देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला आहे.