
या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज
अनेक वर्षांच्या प्रेमानंतर दोन वर्षांपूर्वी या खासदारासोबत केले होते लग्न, म्हणाली आमचे छोटेसे जग…
मुंबई – परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या दोघांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. परिणीतीने इन्स्टाग्रामवर ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. परिणीती आणि राघव त्यांच्या पहिल्या बाळाचे लवकरच स्वागत करणार आहेत.
परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. ही पोस्ट परिणिती आणि राघव दोघांच्याही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर दिसतेय. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. परिणीतीने इन्स्टाग्रामवर एक १+१= ३ लिहिलेला एक फोटो शेअर करुन ही बातमी जाहीर केली आहे. या पोस्टसोबत परिणितीने, ‘आमचे छोटेसे जग… देवाच्या कृपेने लवकरच येणार आहे’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. यासोबतच ती राघवच्या हातात हात घालून पाठमोरी चालत असल्याचा व्हिडिओही तिने फोटोसोबत चाहत्यांसाठी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी ही जोडी कपिल शर्मा शोमध्ये पाहुणे म्हणून आली होती तेव्हाच त्यांनी याबाबतची हिंट दिली होती. पण आता मात्र त्यांनी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर परिणितीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. यावर अनेक चाहते तसेच कलाविश्वात मंडळींनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. शिवाय कमेंट्सच्या माध्यमातून अनेकांनी परिणिती आणि राघव यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान परिणीती चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंह चमकिला’ या चित्रपटात झळकली होती. लवकरच ती नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये झळकणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा २४ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेमविवाह झाला. उदयपूरमध्ये त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. युकेमध्ये असल्यापासून ते एकमेकांना ओळखत होते. ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.