समीर वानखेडेप्रकरणी ही अभिनेत्रीही चाैकशीच्या फेऱ्यात
सीबीआयने केली अभिनेत्रीची चाैकशी, अभिनेत्रीच्या आरोपामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढणार?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देशभरात चर्चेत असलेल्या आर्यन खान लाच प्रकरणात माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने मॉडेल मुनमुन धमेचाची चौकशी केली आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानबरोबर मुनमुन धमेचाला देखील अटक करण्यात आलेली होती.
मुनमुन धमेचाची सीबीआय मुख्यालयात तपास पथकाने चाैकशी केली. एनसीबीचे तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी अटकेत असलेल्या आर्यन खानची सुटका करण्यासाठी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याच प्रकरणी मुनमुनला सीबीआयने चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. याशिवाय सीबीआयकडून शाहरुख खान आणि त्याच्या मुलाला आर्यन खानचा देखील जवाब नोंदवण्याची शक्यता आहे. वानखेडे यांनी टाकलेल्या धाडीत ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह मुनमुन धमेचाला अटक करण्यात आली होती. तिच्याकडून ५ ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याचा आरोप आहे. एनसीबीने ११ मे रोजी लेखी तक्रार दिल्यानंतर दखलपात्र गुन्हा घडल्याचे चौकशीत आढळले. त्यामुळेच वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने नियमित एफआयआर नोंदवला. सीबीआयच्या एफआयआरमध्ये वानखेडेंविरोधात खूपच गंभीर आणि संवेदनशील स्वरुपाचे आरोप आहेत.
https://instagram.com/munmundhamecha_official?igshid=MzRlODBiNWFlZA==
मुनमुन धमेचा फॅशन मॉडेल आहे. मुनमुन ही मध्य प्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे. मॉडेलिंगद्वारेच ती मोठ्या सेलिब्रिटींच्या संपर्कात आली आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींसोबत मुनमुनचे फोटो आहेत. मुनमुन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय आहे.