Latest Marathi News
Ganesh J GIF

इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावली ‘ही’ अभिनेत्री

इर्शाळवाडीशी खास नाते सांगताना अभिनेत्री भावूक, मदत वाडीकडे रवाना, म्हणाली तिथल्या आऊच्या हातचा....

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. तिसऱ्या दिवशीही घटनास्थळी मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने एक पोस्ट शेअर करत मदतीसाठी पुढे आली आहे.

जुई गडकरीने नागरिकांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. जीवनावश्यक वस्तूंची मदत इर्शाळवाडीतील नागरिकांपर्यंत तिची टिम पोहोचवणार आहे. जुईने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, “इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील…” जुईने काही महिन्यांपूर्वी इर्शाळगडाला भेट दिली होती. त्यावेळी अभिनेत्री तेथील स्थानिक लोकांच्या घरात जेवली होती. त्यामुळे तिचे आणि त्या गावातील नागरिकांशी भावनिक नाते तयार झाले होते. ती आपल्या भेटीबद्दल सांगताना म्हणाली होती की, माझा इर्शाळवाडी आणि इर्शाळगडाशी खूप जवळचा संबंध आहे. मी गेल्याच वर्षी तिथे ट्रेक करायला गेले होते. कर्जतच्या आसपास जेवढे गड, डोंगर आहेत…मी जवळपास ते सगळे ट्रेक केलेले आहेत. इर्शाळवाडीत मी जेवले होते. तिथल्या ठाकरवाडीत आम्ही थांबलो होतो. त्यामुळे मला जास्त वाईट वाटतंय. ठाकरवाडीवरील सगळ्याच माणसांचा आम्हाला नेहमी छानच अनुभव आला आहे. त्यांच्या घरात ते आम्हाला आराम करण्यासाठी चटई टाकून द्यायचे. जेवून, आराम करून ऊन कमी झाल्यानंतर आम्ही खाली उतरायचो. इर्शाळगडाची बातमी बघितल्यानंतर या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या. अशी भावनिक आठवण जुईने सांगितली होती. तसेच मदतीचा संकल्प देखील त्यावेळेसच व्यक्त केला होता. कारण यापूर्वीच्या पोस्टमध्ये इर्शाळवाडी या उंचावर असणाऱ्या गावात वीज, मेडिकलची सुविधा नसल्याचे तिने म्हटले होते.


खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर १९ जुलैला कोसळली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने एनडीआरएफ आणि प्रशासनाला अडथळा येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात ट्रेकर्स, एनडीआरएफ यांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!