‘या’ पोलीस निरिक्षकाचे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य
मराठा समाजाच्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर 'मोठी' कारवाई
जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी हे निलंबनाच्या आदेश पारित केले आहेत. तसेच त्यांची अंतर्गत चाैकशी केली जाणार आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. बकालेवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर बकाले याची तत्काळ बदली करण्यात आली होती. पण त्यानंतरही मराठा समाज आक्रमक राहिल्याने अखेर बकालेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून पोलीस उपाधीक्षक यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी पारित केले आहेत. किरणकुमार बकाले याने केलेलं वक्तव्य हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही, असं पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी म्हटले आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन बोलतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामुळे मराठा समाज तसेच राजकीय संघटना आक्रमक झाल्या असल्याचे पहायला मिळत आहे. या गंभीर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.