
भारताची ही स्टार महिला खेळाडू घेणार घटस्फोट
सात वर्षाच्या संसाराचा घटस्फोटाने होणार शेवट, पोस्टमुळे चाहत्यांना धक्का, या कारणामुळे होणार विभक्त?
हैद्राबाद – भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि तिचा पती, माजी भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांनी सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.



सायनाने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली, यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडवली आहे. सायनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, ‘आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार आणि संवादानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वत:साठी आणि एकमेकांसाठी शांती, आत्मविकास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी जीवनाला प्राधान्य देत आहोत. मी माझ्या आयुष्यातील क्षणांबद्दल कृतज्ञ आहे आणि कश्यपला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देते.’ घटस्फोट घेण्यामागचं कारण समोर आलं नसल तरीही सायनाच्या घटस्फोटाची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचं २०१८ साली लग्न झालं होत. मात्र या दोघांच्या ७ वर्षाच्या संसाराला घटस्फोटाचे वळण मिळाले आहे. सायना आणि पारुपल्ली यांची ओळख २००५ मध्ये हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये झाली. दोघांनी एकत्र प्रशिक्षण घेतले आणि २००७ पासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, १४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी साध्या पद्धतीने लग्न केले. सायना नेहवालने अनेक मोठे विक्रम आपल्या नावार केले आहेत. सायनाच्या २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक, जागतिक चॅम्पियनशिपमधील रौप्य आणि कांस्यपदके, तसेच अनेक सुपर सिरीज विजेतेपदे यांचा समावेश आहे. सायनाला आत्तापर्यंत अर्जुन पुरस्कार (2009), राजीव गांधी खेलरत्न (2009-10), पद्मश्री (2010), पद्मभूषण (2016) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


पारुपल्ली यानेही चांगले यश मिळवले आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2014 – सुवर्ण पदक (पुरुष एकेरी) तो हा पराक्रम करणारा तिसरा भारतीय पुरुष शटलर ठरला होता. थॉमस कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारणारा तो पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला होता.


