पुण्यात प्रेयसीच्या घरी जाऊन पतीला जीवे मारण्याची धमकी
रक्षकच बनले भक्षक, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल, निलंबनाची कारवाई
पुणे दि ९(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधावरून प्रेयसीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे पोलीस राहतील एका पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण नागेश जर्दे असे घरात घुसून पतीला मारहाण करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मच्छिंद्र बबन हवले यांनी फिर्याद दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण जर्दे काही वर्षांपूर्वी त्याची नियुक्ती कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या शास्त्रीनगर पोलीस चौकी या ठिकाणी होती. त्यावेळी मच्छिंद्र बबन हवले यांची पत्नीबरोबर सामाजिक सेवा करण्याच्या नावाखाली आरोपी जर्दे आणि तिचे सुत जुळवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. हे संबंध सोडून द्यावेत असे हवले यांनी पत्नीला सांगितले. तिने हे आपला प्रियकर जर्दे याला सांगितले. त्यावरून जर्दे हा त्यांच्या घरात शिरला. त्याने हवले त्यांची आई आणि मुलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे.’ असे म्हणत कमरेच्या पिस्तुलाला हात लावत ‘तुम्हा सर्वांना ठार मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. यानंतर जर्दे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जर्देच्या या महाप्रतापाने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीसच अन्याय करत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
आरोपी प्रवीण जर्दे हा पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातील कोर्टावर या ठिकाणी सध्या नियुक्तीला आहे. दरम्यान जर्देविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याची दखल घेऊन अपर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी त्याला निलंबित केले आहे.