पुणे दि १ (प्रतिनिधी)- अवघ्या पुणे जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या कोट्यवधीच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. इंदापूर जवळ पुणे-सोलापूर साडेतीन कोटीचा दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरोड्याच्या घटनेचा छडा लावण्यासाठी डॉ. अभिनव देशमुख, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शिवाजी होनमाने याने इतर साथीदारांसह हा दरोडा टाकल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम आषि रजत अबू मुलाणी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी काही साथीदार राजस्थानला असल्याची माहिती त्याने दिली त्यानंतर पुणे पोलिसांच्या फरकाने उदयपूरमधील पोलीस पथकाच्या मदतीने गौतम अजित भोसले,किरण सुभाष घाडगे, भुषण लक्ष्मीकांत तोंडे यांना अटक केली. त्याचबरोबर सागर होनमाने याकडून ७२ लाख तर रजत अबू मुलाणी याचेकडून ७१ लाख २० हजार असे एकूण १ कोटी ४३ लाख २० हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
आठवडाभरापुर्वी या आरोपींनी एका गाडीचा पाठलाग करत आणि शस्त्राचा धाक दाखवत साडेतीन कोटींची चोरी केली होती. यामुळे पोलीस प्रशासनाने वेगाने तपास सुरु केला होता. अखेर आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.