मुंबई दि १ (प्रतिनिधी) – शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपुर्वी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री असूनही एकाही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार करुन पालकमंत्री जाहीर केले जाणार आहेत.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. खासकरुन शिंदे गटातील नाराजी जाहीरपणे समोर आली होती. त्यामुळे दुसरा विस्तार लवकर करण्याची मागणी इच्छुकांनी केली होती. अगोदरच भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना देऊन अन्य महत्त्वाची खाती स्वत:कडेच घेतली आहेत. महसूल, उच्च व तंत्रशिक्षण, वने, आदिवासी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ही खाती भाजपाकडे आहेत. तर पाणी पुरवठा व स्वच्छता, बंदरे व खनिकर्म, अन्न व औषध, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, कृषी, शालेय शिक्षण, सहकार, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन, महिला व बालकल्याण या विभागांचे मंत्री शिंदे गटाचे आहेत. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री तसेच राज्यमंत्री देखील नाहीत. त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा आहे. दुस-या विस्तारात शिंदेचा नाराजी दुर करताना कस लागणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तार करताना प्रादेशिक समतोल साधला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येतील असे सांगण्यात आले होते. पण काही वरिष्ठट मंत्र्यांनी त्याचा ओम्कार केला होता.तरीदेखील, काही खात्यांची आदलाबदली होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.