पुणे दि २१(प्रतिनिधी)- वाघोली येथील मोझे कॉलेज रस्ता येथील एका सोसायटीच्या चेंबरमधे काम करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वाघोली येथील बाय रोडवरील सोसायटीमध्ये चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड,गणेश भालेराव, आणि सतीशकुमार चौधरी या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मृत कामगारांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वाघोली येथे मोझे कॉलेज रस्ता येथे सोलांसिया नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या परिसरातील चेंबरमध्ये काम करण्यासाठी दोन कामगार आले होते. चेंबर साधारण १० फुट खोल होते.मात्र, मैला पाण्यामुळे आत मिथेन गॅस तयार होत असतो. यामुळे श्वास घेताना त्रास होतो. एक कामगार चेंबरमध्ये उतरल्यानंतर त्याला चक्कर आल्याने त्याच्या मदतीला दुसरा खाली उतरला.त्यालाही त्रास होऊ लागल्याने सुरक्षा रक्षक मदतीसाठी आत गेला व तिघेही अडकले. ही माहिती तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर तेथे तत्काळ दाखल झालेल्या जवानांनी चेंबर मधून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही दाखल झाले होते. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
चेंबर साफ करताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने मिळून आलेली नाहीत अशी प्राथमिक महिती आहे.याआधीही कदमवाक वस्तीत अशाप्रकारची घटना घडली होती. त्यावेळी चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वाघोलीतील ही घटना घडली आहे.