
पुण्यातील भयानक अपघातचा थरारक व्हिडिओ समोर
कारचालकाने घेतला एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी, दारूच्या नशेत भविष्याचा चुराडा
पुणे – हिट अँड रनच्या घटना राज्यात खासकरून पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कल्याणी नगरची भीषणता अनेकांनी पाहिली आहे. आता त्याच पुण्यात सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलसमोर एका कारचालकाने सहा ते सात जणांना चिरडलेले आहे.
शनिवारी (३१ मे) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका टी स्टॉलवर हे विद्यार्थी चहा पित उभे होते. तेव्हा हा अपघात घडला. या अपघातानंतर चालक, सहप्रवासी तसेच कारमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चालक आणि सहप्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी कारचालक जयराम शिवाजी मुळे, सहप्रवासी राहुल गोसावी, आणि कार मालक दिगंबर शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे , मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे , गुलनाज सिराज अहमद असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अनेक क्लास आहेत. इथे अनेक अभ्यासिका देखील आहेत. संध्याकाळची वेळ असल्याने काही विद्यार्थी चहाच्या स्टॉलवर गेले होते. यावेळी तिथे आलेल्या भरधाव कारने अनेकांना उडवलं.हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे. व्हिडीओत अपघाताची भीषणता दिसत असून किंचाळण्याचा आवाज देखील येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य नऊ किरकोळ जखमींना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.