परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोचना ज्ञानेश्वर पवार (वय ३२ ) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लोचना यांचा आव्हई येथील ज्ञानेश्वर उध्दव पवार यांच्यासोबत १२ वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन अपत्य देखील झाली. मात्र, मागच्या काही दिवसापासून लोचना यांच्या पतीला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे पती कामधंदा न करता “माहेरहून पैसे घेऊन ये”, असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्यात आली. लोचना यांना सासू-सासरे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. मृत लोचना यांनी या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवलं होतं. मात्र, या घटनेनंतरही सासरकडील मंडळींकडून होणारा त्रास सुरूच राहिला. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून लोचना यांनी आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत महिलेच्या मुलाने ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. ही घटना उघडकीस येताच पती ज्ञानेश्वर, सासु सखुबाई, सासरा उध्दव श्रीपती पवार हे गावातून पसार झाले. पोलीस निरिक्षक सुभाष मारकड, साहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड, साहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चव्हाण, जमादार अमर चाउस यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.