
“आज मला जाणवलं की मी तुझ्यासाठी काहीच नाही”
भावनिक पोस्ट शेअर करत माॅडेलची आत्महत्या, लग्न पुढे ढकलल्यामुळे टोकाचा निर्णय? अंजलीसोबत काय घडले?
सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये एका मॉडेलने आत्महत्या केली आहे. माॅडेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक रहस्यमय संदेश असलेली रील पोस्ट केली होती. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आत्महत्या करणा-या मॉडेलचे नाव अंजली वरमोरा असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजलीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासात मानसिक तणाव आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबी समोर येत आहेत. पण अद्याप अंजली वरमोराच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली तिच्या कुटुंबासोबत नवसारी बाजारजवळील कार्तिक अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या खूप खचली होती, हे तिच्या तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट्सवरून लक्षात येते. अंजलीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. “आज मला जाणवलं की मी तुझ्यासाठी काहीच नाहीये. सगळं काही हरवलं तरी काही फरक पडत नाही, पण प्रेम हरवलं तर खूप त्रास होतो’… असं तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच याप्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. दोन वर्षांपूर्वी अंजलीचा सूरतमधील एका पुरूषाशी साखरपुडा झाला होता. या दोघांचे या वर्षी लग्न होणार होते. पण मॉडेलच्या नवऱ्याच्या आईचे निधन झाले, ज्यामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. अंजलीचा मोबाईल तपासासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच तिचे शेवटचे बोलणे कुणाशी झाले हे शोधण्यासाठी सीडीआर आणि आयडीआर तपासले जात आहेत.
अंजली वरमोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. ती तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नियमितपणे रील्स शेअर करायची आणि तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर व्हीलॉग देखील पोस्ट केले. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर तब्बल ३७ हजार फॉलोअर्स आहेत.