
प्रेमविवाह करूनही हुंड्यासाठी छळ, विवाहितेची आत्महत्या
पैसे आणि गाडीसाठी सतत धमकी आणि छळ, गर्भवती आशाराणीची आत्महत्या, बहीणीचाही तसाच छळ
सोलापूर – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा असतानाच आता सोलापुरमध्ये देखील सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले या विवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
आशाराणी हिचे २०१९ साली मोहोळ तालुक्यातील पवन भोसले यांच्याशी लग्न झाले होते. आशाराणीची बहीण उशाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याच्या भावासोबत ज्ञानेश्वर सोबत झाला आहे. पण आशाराणी भोसलेच्या यांच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये आशाराणीची मोठी बहीण उशाराणी हिचा विवाह ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांचा लहान भाऊ पवन भोसले याने आमची धाकटी मुलगी आशाराणी हिला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला. पण मुलगी झाल्यापासून आशाराणीला तिच्या सासरच्यांकडून मारहाण केली जात होती. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना कन्यारत्न झाले. वैष्णवी असे या मुलीचे नाव असून तिच्या जन्मानंतरच आशाराणीवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. चारचाकी गाडी आणि खर्चासाठी पैसे आणावेत, यासाठी तिला सातत्याने त्रास दिला जात होता. दोन वेळा तर पवन याने व्हिडीओ कॉलवरूनच आशाराणीच्या आई-वडिलांसमोर तिला मारहाण केली. कमाल म्हणजे छळ सहन न झाल्यामुळे २०२४ साली आशाराणी माहेरी रायचूरला निघून आली. त्यानंतर पती पवन याने ‘पत्नी नांदायला येत नाही’ अशी तक्रार पोलिसांत केली. महिला तक्रार निवारण केंद्राच्या समुपदेशनानंतर आशाराणीला पुन्हा सासरी पाठवण्यात आले होते. पण तरीही चार चाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असं म्हणून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. याच छळाला कंटाळून आशाराणीने गळफास घेत आयु्ष्याचा शेवट केला.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पवन भोसले, अलका भोसले, बलभीम भोसले या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच नवरा पवन भोसले याला पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर आरोपी सासू आणि सासऱ्याला देखील आता पोलिसांनी अटक केली आहे.