Latest Marathi News
Ganesh J GIF

७ जुलैला तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान!; तुकोबांच्या पालखी रथासाठी संस्थानाकडून खास बैलजोड्यांची खरेदी

मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी भक्तांना वेध लागते ते पंढरीच्या पांडुरंगाचे! पंढरीच्या वारीची उत्सुकता आणि विठ्ठल भेटीच्या ओढीने वारकरी आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी येत असल्याने, आत्तापासूनच पंढरीच्या वारीचे नियोजन सुरू झाले आहे. अशातच, विठ्ठलभक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

७ जुलै रोजी देहूतून प्रस्थान

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून भक्ती, श्रद्धा आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामस्मरणाच्या गजरात संत तुकोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये आणि यंदाचे बदल

सोहळा प्रमुख नियुक्ती: यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी संस्थानतर्फे विशेष काळजी घेण्यात आली असून, तीन नवीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या बैलजोड्या यंदाच्या मुख्य सोहळ्यात सहभागी होतील.

माऊलींच्या पालखीचीही उत्सुकता शिगेला!

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक समोर आल्यानंतर, आता वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची उत्सुकता लागली आहे. माऊलींची पालखी आळंदीतून पंढरीकडे कधी प्रस्थान करणार, याचेही अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे लाखो वारकरी, हजारो दिंड्या आणि या दोन्ही मुख्य पालख्यांसह राज्यातील इतर मानाच्या पालख्या सध्या आपापल्या वारीचे नियोजन करत आहेत.

शेगावच्या गजानन महाराजांसह शेकडो पालख्या निघणार

पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पालख्या येत असतात. त्यामध्ये, जळगावमधून संत मुक्ताई आणि बुलढाण्यातून संत गजानन महाराजांची पालखी शेगाव ते पंढरपूर असा पायी प्रवास करते. हत्ती, घोडे, पालखी आणि ‘माऊली माऊली’चा गजर करत शेकडो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात.आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी पंढरीत चंद्रभागेच्या तिरी गोळा होतात आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पंढरपुरात पाहायला मिळतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!