मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतेच महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, तर काँग्रेसने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर आता त्यांच्या विरोधात एमआयएम देखील मैदानात उतरले आहे.
“महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचा आम्ही निषेध करतो. वारंवार महापुरुषांवर अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भिडे हे नथुराम गोडसे याची औलाद असल्याचा आरोप करत जो कोणी भिडे यांची मिशी न कापता पाय तोडून आणेल त्यांना मी दोन लाख रुपये देणार” असल्याची घोषणा सोलापूर एमआयएमचे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी केली आहे.
संभाजी भिडे यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
एमआयएमच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
प्रवक्ते कोमारो सय्यद म्हणाले, महात्मा गांधी हे थोर नेते होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान फार मोठे आहे. अशा महापुरुषांविषयी संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करीत आहे. अशा देशद्रोही भिडे यांना राज्य, केंद्र सरकार पाठिशी घालत आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो. भिडेंना तातडीने अटक करावी.