
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन आमदारांना राजीनामा देण्याचे आदेश
मंत्रीपद मिळूनही पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका, आमदारकी रद्द करण्याची मागणी, राजकारण तापणार?
दिल्ली – ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांमध्ये आता केरळवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. या राज्यातील दोन आमदारांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
केरळमध्ये २०२१ यावर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी अविभाजित पक्ष होता. संबंधित निवडणुकीत राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये थॉमस के. थॉमस आणि ए.के.शशिंद्रन यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने त्या राज्यातील सत्तारूढ डाव्या लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे त्या पक्षाला केरळमध्ये १ मंत्रिपद मिळाले. त्यामुळे शशिंद्रन सध्या मंत्री आहेत. तर, थॉमस राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. या दोन आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पटेल यांनी पत्र पाठवत राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत. आमच्या घड्याळ या चिन्हावर केरळमधील आमदार निवडून आल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्या चिन्हावर निवडून येऊनही शशिंद्रन आणि थॉमस अजित पवार पक्षाविरोधात कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. अन्यथा, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. मात्र, केरळमधील दोन्ही आमदारांनी अजित पवार पक्षाच्या पत्राकडे दुर्लक्ष करण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. आमच्यासह राष्ट्रवादीची केरळ शाखा प्रारंभापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहोत. आमचा अजित पवार पक्षाशी संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
संबंधित मुद्द्यावर केरळ विधानसभेचे सभापती निर्णय घेणार आहेत. केरळमध्ये पुढील वर्षीच्या एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी आता काही महिन्यांचाच अवधी शिल्लक आहे. अशात त्या राज्यातील २ आमदारांवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान केरळचे सभापती कोणता निर्णय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.