लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे.शिवसेना उबाठाकडून सर्वाधिक 21 जागेवर उमेदवार उभे करण्यात आले होते. काँग्रेसकडून 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यात काँग्रेसला 13, शिवसेनेला 9 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा पैकी 8 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे आता शरद पवार यांनी विधानसभेसाठी व्यूहरचना सुरु केली आहे. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, असे शरद पवार यांनी शुक्रवारी म्हटले आहे.
शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यात आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवार आणि जयंत पाटील उपस्थितीत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बैठकीला शरद पवार गटातील राज्यातील सर्व खासदार उपस्थित होते. त्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील एकजूट राहवी म्हणून मी दोन पावले मागे आलो. खरंतर लोकसभेला आपल्या पक्षाला जास्त जागा हव्या होत्या. परंतु आता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी राहवी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा. राज्य हातात घ्यायचं आहे याची तयारी ठेवा. लोकांची जास्तीत जास्त काम करा. लोकांचा फारसा संबंध दिल्लीत येत नाही. राज्यात प्रश्न महत्वाचे असतात. त्यामुळे विधानसभेच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर या बैठकीला आले आहे.
माढा लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले की, पवारसाहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माझ्या विजयात करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा अनेक पटीत माझ्याकडून कामकाज झाले पाहिजे.