
मुंबईतील प्रसिद्ध झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धारावीच्या विकासासाठी अदानी समूह आणि मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्र काम करत आहेत.आता अदानी समूहाने या प्रकल्पाची जबाबदारी एका जागतिक समूहाकडे सोपवली आहे.अशात आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज्य आणि केंद्र सरकारला घेरत गौतम अदानी समूहावर थेट वार केला.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले,’सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडत आहे. आतापर्यंत केलेला कारभार जनता विसरुन, फसव्या योजनांना बळी पडेल अशी अपेक्षा आहे. बाकीच्या योजनांबद्दल आज मी काही बोलणार नाही. त्याच्याबद्दल जनता बोलतेय, अनुभव घेत आहे. मला वाटेल तेव्हा मी, आदित्य आवाज उठवू. आज मी लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका उद्योगपती योजनेबद्दल बोलणार आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. अदानींचा ‘लाडका मित्र’ असा उल्लेख करत शिंदे आणि मोदी सरकारवरही ठाकरे यांनी टीका केली.
धारावी पुनर्वसन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले,’हा प्रकल्प जरी होत असला तरी धारावीकरांना त्यांच्या हक्काचे आणि ५०० फुटांचे घर तिथेच मिळाले पाहिजे. कारण तिथे अनेक मायक्रो स्केल उद्योग चालतात. त्यामुळे या उद्योगांचे काय करणार असा प्रश्न ठाकरेंनी दोन्ही सरकारांना विचारला. मुंबईतून गिफ्ट सिटी पळवली आहे, आता मुंबईला अदानी सिटी बनवून मुंबई अदानींच्या खिशात घालण्याचा डाव आहे.’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला.