पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु होती.
याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ‘सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल होत असून नव्या टर्मिनलमध्ये इनलॅंड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. याची तांत्रिक ही प्रक्रिया वेगाने सुरु असून तातडीने पूर्ण केली जात आहे. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १४ जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे’. नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आहे. एअर इंडियाच्या प्रवाशाला १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित करणार आहेत.