
पुणे दि ६ (प्रतिनिधी)- नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. पण यावेळी पुणे जिल्ह्यातील टाकली हाजी ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळी ठरली. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष माजी आमदार पोपटराव गावडे यांची सत्ता होती.पण दामूशेठ घोडे यांनी त्यांच्या एकहाती सत्तेला सुरंग लावत मोठा विजय मिळवला आहे. पण यावेळी ‘ही माझी निवडणूक नसून, माझे लग्न आहे,’ असे विधान घोडे यांनी केले होते.विशेष म्हणजे विजय मिळवल्यानंतर लग्नसोहळा संपन्न करीत अगदी लग्नातील सर्व विधी पार पाडून त्यांचा शब्द खरा करून दाखविला.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दामूशेठ घोडे यांच्या पॅनेलने १६-०१ असा दणदणीत विजय संपादित केला आहे.या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याबरोबरचे राजकीय मतभेद ताणले गेल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. घोडे यांनीसुद्धा एकही जागा बिनविरोध होऊ नये म्हणून सर्व सतरा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. काही जागांवर समोरच्या पॅनेलचे तगडे उमेदवार पाहून त्यांच्याविरोधात कुणीही लढायला तयार होत नसल्याचे पाहून या ठिकाणी घाेडे यांनी आपल्याच घरातील उमेदवार उभे केले होते यावेळी प्रचारात त्यांनी ‘ही निवडणूक नसून, माझे लग्न आहे. मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे, तर एक नंबर प्रभागामधून अरुणाताई माझी नवरी असून, दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सूनबाई ही आमची कलवरी आहे. तुम्ही सर्वजण माझे वऱ्हाडी आहात आणि निकाल म्हणजेच माझे लग्न असेल,’ असे धक्कादायक विधान केले होते.विशेष म्हणजे निकाल जाहिर झाल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटनस्थळ येथील मंगल कार्यालयात जाऊन एक अनोखा विवाहसोहळा संपन्न केला. या दिमाखदार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या विवाहसोहळ्यास घोडे दाम्पत्याची मुले, सुना, नातवंडेसुद्धा उपस्थित होते.
यापूर्वी दामूशेठ घोडे यांनी त्यांच्या प्रभागामधून सलग पंधरा वर्षे बिनविरोधाची परंपरा राखली होती. परंतु, या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याबरोबरचे राजकीय मतभेद ताणले गेल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.