
महाराष्ट्रातील माजी मंत्र्याच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, दगडाफेक करत ऑइल फेकले
मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा संशय, जिल्हा बँक निवडणुकीमुळे हल्ला केल्याचाही अंदाज, शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधान?
जालना दि २(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांकडून टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या गाडीची समोरची काच फुटली आहे. यामुळे चर्चांना उधान आले आहे.
जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानिमित्तानं राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. टोपे यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली आहे. दरम्यान सध्या जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यावेळीच राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे बँक निवडणुकीच्या वादातून हा हल्ला झाला असा अंदाज होता. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचीही चर्चा आहे. “असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केलं असेल त्यांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे” अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले होते. दगडफेक झालेल्या ठिकाणी ऑईलने भरलेली एक बॉटल देखील दिसून येत आहे. पोलीस तपासानंतर या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे याची माहिती समोर येईल. मात्र या घटनेने शहरतील वातावरण ढवळून निघाले आहे.
राजेश टोपे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान मराठा आंदोलन काळात राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना अघोषित बंदी घातली होती ती उठवली असताना या तोडफोडीचा याच्याशी काही संबंध आहे या यावरही तपास केला जात आहे.