
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला बीडच्या कारागृहात बेदम मारहाण
गीत्ते गँगकडून कराड आणि घुलेवर हल्ला, जिल्हा कारागृहात जोरदार राडा, यामुळे झाली मारहाण
बीड – बीड जिल्ह्यात रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. त्यातच आता बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गित्ते गँगमध्ये दे मार मारामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार सुरेश धस यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
कारागृह नियमावलीनुसार, रोज सकाळी १०:३० ते ११ या वेळात बंदी उठवली जाते. बंदी उठवली जाते म्हणजे, यावेळेत तुरुंगात कैद्यांना मोकळे सोडले जाते. याच कालावधीमध्ये बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्या गँगमध्ये मारामारी झाली असल्याची माहिती आहे. या मारहाणीबद्दल तुरुंग प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. तर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेला. सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली , नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन गटातले दोन्ही आरोपी आमनेसामने यापूर्वी आले होते. दादा खिंडकर या मारहाणीतील आरोपीनेही अशाच प्रकारचा आरोप केला होता. कराडने एका खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गिते गँगचा आरोप आहे. आणि हाच आरोप करत, त्या मुद्यावरून ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह महेश केदार, विष्णू चाटे, जयराम, सिद्धार्थ, यांना अटक करण्यात आले आहे. हे सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत.
वाल्मिक कराड हा चित्रपट निर्माता असल्याचेही उघड झाले आहे. त्याचे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचे ओळखपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. राखेच्या बेकायदा धंद्यातून आणि खंडणीतून मिळवलेला पैसा त्याने बॉलिवूडमध्ये गुंतवल्याची शक्यता आहे.