
मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज होते. काल संध्याकाळी मोरे यांनी केलेली फेसुबक पोस्ट चांगलीच चर्चेत आली. “एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो” असं वसंत मोरे यांनी पोस्ट केले होते. त्यामुळे मोरे हे पक्षात नाराज असल्याचे पुन्हा दिसून आले. आता पुन्हा वसंत मोरे यांनी पोस्ट करून साहेब मला माफ करा असं म्हणत मनसेला राम राम केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात वसंत मोरे म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे असं त्यांनी सांगितले

त्यानंतर भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती असं वसंत मोरे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. सातत्याने त्याबाबत हे जाहीरपणे इच्छुक असल्याचे बोलत होते. परंतु पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही आपण पुण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. यातच याआधीही वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांकडून जाणुनबुजून डावललं जात आहे. कुठल्याही बैठकीला आमंत्रित केले जात नाही असं म्हटलं होते. त्यामुळे वसंत मोरे आणि त्यांची नाराजी पुण्यात चर्चेचा विषय बनली होती.

