ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
वारकरी संप्रदायाचा आधार हरपला, अनोख्या कीर्तन शैलीचे जगावर गारूड, सामाजिक कार्यातही पुढाकार
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वारकरी संप्रदायाला जगभरात ओळख मिळवून देण्याचे काम बाबा महाराज सातारकर यांनी केले. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराज सातारकर यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला होता. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केले होते. वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले. २६ मार्च १९५४ रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. त्यांच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे त्यांनीही परमार्थाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या अनोख्या कीर्तन आणि प्रवचन शैलीचे जगभरात चाहते होते. फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत. दरम्यान बाबा महाराज सातारकर यांच्याकडे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरीची परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याकडे गेली अनेक वर्ष आहे. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली. भाविकांना या संस्थेमार्फत विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधं पुरवली जातात. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फ माईसाहेब यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते. आणि आज बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे.
बाबामहाराज सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबामहाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची विशेष आवड होती. आप्पामहाराज देहावसानानंतर १९६२ सालापासून त्यांची परंपरा बाबामहाराजांनी पुढे चालू ठेवली. समाजप्रबोधनचं कार्य म्हणून डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबामहाराजांनी सुरू केली होती.